महाराष्ट्र शासन शाळा तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी – विद्यार्थिनींना घरातून शाळेला जाताना अथवा शाळेतून घरी येताना एसटी प्रवासात काही अडचण आल्यास अथवा एसटी बसेस वेळेवर न आल्यास, अचानक रद्द करण्यात आल्यास त्यांना योग्य ती मदत मिळावी, यासाठी एसटी महामंडळाने 1800 221 251 या क्रमांकाची #हेल्पलाईन सुरु केल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
एसटी बसेस उशिरा सुटणे, अचानक रद्द होणे अथवा अन्य कारणामुळे शालेय विद्यार्थी- विद्यार्थिनींचे तास चुकतात किंवा परीक्षेला ते वेळेवर पोहोचू शकत नाहीत, काही वेळेला त्यांची महत्त्वाची परीक्षा देऊ शकत नाहीत. विद्यार्थ्यांच्या अशा शालेय नुकसानीला संबंधित क्षेत्रातील आगार व्यवस्थापक व त्यांचे पर्यवेक्षक यांना जबाबदार धरण्यात येईल तसेच, सोमवार ते शुक्रवार सायंकाळी ५ – ६ या वेळेत मुख्य बसस्थानक व जेथे विद्यार्थी चढ-उतार जास्त होते, अशा थांब्यावर संबंधित आगाराच्या पर्यवेक्षकांनी गणवेशात थांबून वाहतुकीचे नियोजन करावे. शाळेचा शेवटचा मुलगा अथवा मुलगी बसने सुखरूप घरी जाईपर्यंत संबंधित पर्यवेक्षकांनी तेथून हलू नये, अशा स्पष्ट सूचना मंत्री सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिल्या आहेत.
शालेय बस फेऱ्यांच्या गैरव्यवस्थापनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याची लेखी तक्रार संबंधित विद्यार्थी/विद्यार्थिनी, संबंधित शाळा – महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक व प्राचार्यांनी केल्यास जितक्या दिवसाचे शालेय नुकसान होईल, तितके दिवस यास जबाबदार असणारे पर्यवेक्षक अथवा अधिकाऱ्यांना निलंबित अथवा सक्तीच्या रजेवर पाठवण्यात यावे, असे निर्देशही मंत्री सरनाईक यांनी एसटीचे महाव्यवस्थापक (वाहतूक) यांना दिले आहेत.