पुणे : पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे भ्रष्ट्राचार, हप्ते वसुलीबाबत अतिशय कडक असतानाच आठवड्याच्या आत लाच घेताना तिसऱ्या पोलिसांला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले आहे. चेक बाऊंस प्रकरणात अजामीनपात्र वॉरंट न बजावण्यासाठी अगोदर ५ लाख रुपयांची लाच घेतली असताना पुन्हा नव्याने वॉरंट परत आले असल्याचे सांगून अटक न करण्यासाठी अडीच लाख रुपयांची लाच मागून दीड लाख रुपये स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदाराला सापळा रचून पकडले.
गणेश शहाजी कस्पटे असे या पोलीस हवालदाराचे नाव आहे.
पुणे पोलीस दलातील खंडणीखोर पोलीस उपनिरीक्षकासह तिघांना पोलीस दलातून बडतर्फ करण्याची कारवाई मंगळवारी करण्यात आली होती. त्या अगोदर आदल्या दिवशी सोमवारी लाचखोर सहायक पोलीस निरीक्षक वैशाली तोटेवार व पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे यांना निलंबित केले होते. त्यानंतर आता हा तिसरा प्रकार समोर आला आहे.