तिरोडा, प्रतिनिधी :
पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र, जिल्हा गोंदिया यांच्या वतीने तिरोडा तालुक्यात सुरू असलेल्या मातोश्री पाणंद रस्ते व मनरेगा अंतर्गत विकासकामांमध्ये होत असल्याचा आरोप असलेल्या अनियमिततेबाबत सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भातील निवेदन संबंधित अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून सादर करण्यात आले.
समितीच्या निवेदनानुसार, काही ठिकाणी सुरू असलेल्या रस्ते बांधकामांमध्ये निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याची तक्रार असून, कामाच्या ठिकाणी आवश्यक माहिती फलक नसणे, मनरेगा नियमांचे उल्लंघन, स्थानिक मजुरांना डावलून बाहेरील मजुरांचा वापर तसेच यंत्रसामग्रीद्वारे कामे केल्याचे आरोप करण्यात आले आहेत.
तसेच रस्ते बांधकामासाठी करण्यात आलेले मोजमाप, अंदाजपत्रक, मस्टर रोल, हजेरीपत्रक, देयके व अन्य प्रशासकीय कागदपत्रांची स्वतंत्र चौकशी करून संबंधित कामांचे तांत्रिक (Technical Audit) व आर्थिक (Financial Audit) परीक्षण करण्यात यावे, अशी मागणी पत्रकार संरक्षण समितीने केली आहे.
यावेळी पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्रचे गोंदिया जिल्हाध्यक्ष अजय वामन बर्वे, गोंदिया जिल्हा कोषाध्यक्ष प्रवीण शेंडे, तिरोडा तालुका अध्यक्ष श्रावण प्रितीराम बरीयेकर, तालुका उपाध्यक्ष राकेश कुमार टेंभेकर, तालुका सचिव महेंद्र कनोजे,तालुका कोषाध्यक्ष तरुण कनोजे, तालुका प्रतिनिधी जोगेंद्र आगासे तसेच मुकेश बोपचे प्रतिनिधी उपस्थित होते.
पदाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले व विकासकामांमध्ये पारदर्शकता राखून शासन निधीचा योग्य वापर व्हावा, दोषी आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली.
प्रशासनाने निष्पक्ष चौकशी करून अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणी पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्रने केली असून, या प्रकरणाकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
गोंदिया जिल्हा रिपोर्टर
महेंद्र कनोजे कि रिपोर्ट