पालखी आगमनापूर्वी जानेफळ ग्रामपंचायतीकडून पालखी मार्गाची दुरुस्ती
बुलढाणा : प्रतिनिधी
जानेफळ येथे संत गजानन महाराजांची पालखी १५ ऑगस्ट रोजी दाखल होणार आहे. या पार्श्वभूमीवर पालखी मार्गावरील खड्डे बुजवून रस्ता सुस्थितीत करण्याचे काम जानेफळ ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
पालखी मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या भाविकांसह नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता होती. त्यामुळे ग्रामपंचायतीने पालखी सोहळ्यापूर्वी रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. काँक्रीटच्या सहाय्याने खड्डे बुजविण्यात येत असून, पालखी मार्ग वाहतुकीसाठी सुरळीत करण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतीकडून केला जात आहे.
रस्ता दुरुस्तीच्या कामावेळी माजी पंचायत समिती सदस्य गजानन वडणकर, उपसरपंच विजय कृपाळ, ग्रामपंचायत सदस्य तथा शिवसेना शहरप्रमुख मंटू राजूरकर, ग्रामपंचायत सदस्यपती संजू सुरजुसे आदी उपस्थित होते. पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीकडून पालखी मार्गाची स्वच्छता व आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.
ITN National | District Reporter