धानोरा तालुक्यातील कामनगड ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मंगेवडा जवळील बांडीया नदीवर पुलाचे बांधकाम करण्याबाबत कामनगड ग्रामपंचायतचे सरपंच संजय गावडे यांनी गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेवजी किरसान यांना निवेदन दिले
धानोरा तालुक्यातील कामनगड ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मंगेवडा हे गाव महाराष्ट्र राज्याच्या शेवटच्या टोकाला छत्तीसगड सीमेलगत असून अतिदुर्गम भागात आहे. त्या ठिकाणी ये-जा करण्याकरिता नदीवर पुलीया नाही. अनेक वर्षापासून सतत मागणी होत असून, मंगेवडा या गावी जाण्यासाठी तसेच छत्तीसगढ राज्य जोडण्याकरिता या रस्त्यावर पुलीया नाही. त्यामुळे गावकऱ्यांना आरोग्यविषयक, शैक्षणिक तथा विविध कामाकरिता तालुका व जिल्हा मुख्यालयी आवागामन करणे वर्षानुवर्षे सतत त्रास सहन करावा लागत आहे.
सदर बांडीया नदीच्या पुलाचे बांधकामामुळे कामनगड ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मंगेवडा हा गाव तसेच छत्तीसगड व महाराष्ट्र राज्य जोडला जाणार आहे. म्हणून सावंगा ते मंगेवडा या रस्त्यावरील बांडीया नदीवर पुलीया मंजूर करून लवकरात लवकर नदीवर पुलाचे बांधकाम करण्यात यावे.
तरी माननीय खासदार महोदयांना वरील समस्याचे निराकरण करण्याकरिता लक्ष वेधण्यात येत आहे. असे निवेदन संजय गावडे यांनी दिले.