पुणे
पुण्यातील हडपसर परिसरात 13मे रोजी उषा किरण रुग्णालयात बॉम्बसदृश स्फोटक ठेवून मोठा अनर्थ घडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या नागपूरच्या तरुणाला महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) अटक केली आहे. शिवाजी राठोड असे आरोपीचे नाव असून, प्राथमिक तपासात हे कृत्य जुन्या वैरातून केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
१३ मे रोजी संध्याकाळी ICU जवळील स्वच्छतागृहात चार पांढऱ्या सिलिंडर, वायर आणि डिजिटल टायमर असलेली संशयास्पद वस्तू आढळली होती. रुग्णालय प्रशासनाने प्रसंगावधान राखत ती वस्तू बाहेर हलवली. त्यानंतर बॉम्ब शोधक व नाशक पथकाने नियंत्रित स्फोट करून ती निष्क्रिय केली.
या घटनेत ICU मधील रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि रुग्णालयातील कर्मचारी यांचा जीव धोक्यात आला होता. हडपसर पोलिस ठाण्यात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, या कटामागे आणखी कोणी सहभागी आहे का याचा तपास पोलीस पथके करत आहेत. एवढ्या जलद तपासामुळे नागरिकांकडून ATS पथकाचे पोलीसांचे कौतुक केले जात आहे.
ITN News रिपोर्टींग कृष्णा इंगोले.