
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कर्मचारी भरतीत गैर प्रकार
‘आप’ची जिल्हाधिकारी, वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडे तक्रार
वाशिम : शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात खासगी कंपनीच्या माध्यमातून कर्मचारी भरती करण्यात आली. मात्र, ही भरती नियमांना डावलून केल्याची शंका असल्याने, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना कठोरात कठोर शासन करावे, तसेच वृत्तपत्रात जाहिरात प्रकाशित करून पुन्हा भरती राबविण्यात यावी, अशी मागणी ‘आप’च्यावतीने 9 मे रोजी जिल्हाधिकारी तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले की, मागील २ महिन्यापूर्वी ‘क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड’ या खाजगी कंपनी मार्फत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वाशिम येथे १८० कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली आहे. ही भरती करताना वृत्तपत्रातून कोणत्याही प्रकारची जाहिरात देण्यात आली नसून, या भरतीदरम्यान कोणतेही शैक्षणिक निकष पाळण्यात आलेले नाहीत. तसेच या भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याची शंका येत आहे. त्यामुळे या गंभीर बाबीची सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कार्यवाही करावी व स्थानिक वृत्तपत्रात नव्याने जाहिरात देऊन अर्ज मागविण्यात यावे, तसेच गुणानुक्रमे पदनिहाय भरती करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
—-
अधिष्ठातांशी चर्चा
या भरती प्रक्रियेच्या गैरप्रकाराबाबत वाशिम येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांना निवेदनाची प्रतिलिपी सादर करण्यात आली. तसेच या गंभीर प्रकाराबाब चर्चा करण्यात आल्याची माहिती राम पाटील डोरले यांनी दिली.