एकोडी ग्रामसभेत स्मार्ट इलेक्ट्रिक मीटर बसवण्याविरोधात ठराव
स्थानिक ग्रामपंचायत एकोडी येथे नुकत्याच पार पडलेल्या ग्रामसभेत गावात स्मार्ट इलेक्ट्रिक मीटर बसवण्याविरोधात ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. ग्रामसभेला गावातील नागरिक, शेतकरी, महिलावर्ग तसेच ग्रामपंचायतीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामसभेत बोलताना ग्रामस्थांनी सांगितले की, स्मार्ट मीटर बसविल्यानंतर वीजदर वाढण्याची शक्यता असून, गरीब व शेतकरी वर्गावर अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. तसेच स्मार्ट मीटरच्या अचूकतेबाबत आणि वापर पद्धतीबाबत अनेक शंका उपस्थित झाल्या. काही नागरिकांनी सांगितले की, ग्रामीण भागातील तांत्रिक सुविधा व स्मार्ट मीटर व्यवस्थापनाच्या समस्यांचा विचार न करता हा निर्णय घेतला आहे.
ग्रामपंचायत मध्ये ग्राम सभेचे अध्यक्ष सरपंच शालू ताई चौधरी असुन सभेत स्मार्ट विरोधात चर्चा करण्यात आली. नागरिकांच्या मतांचा विचार करून ग्रामसभेत ठराव मांडला आणि तो एकमताने मंजूर करण्यात आला. यानुसार, संबंधित वीज वितरण कंपनीला आणि प्रशासनाला या ठरावाची माहिती देऊन स्मार्ट मीटर बसविण्याचा निर्णय मागे घेण्याची मागणी करण्यात येणार आहे.
यावेळी ग्राम सभेत ग्राम पंचायत सरपंच शालू चौधरी, ग्राम विकास अधिकारी एस एम गौतम, ग्राम पं सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष रिनायत, पुर्व सरपंच रविकुमार पटले, पुर्व उपसरपंच किरणकुमार मेश्राम, ग्राम सदस्य पुरुषोत्तम भदाडे, नामदेव बिसेन, राकेश बिसेन, दीपक बिसेन, तसेच मोठ्या संख्येने गावकरी असुन
ग्रामसभेत गावातील विविध प्रश्नांवरही चर्चा झाली. वीज पुरवठा सुधारणा, शेतकऱ्यांना तातडीने उपलब्ध होणारी वीज, तसेच पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्ती आदी विषयांवर नागरिकांनी सूचना केल्या. स्मार्ट मीटरविरोधातील ठरावामुळे गावात समाधान व्यक्त होत असले तरी पुढील काळात प्रशासनाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
जिल्हा रिपोर्टर
महेंद्र कनोजे गोंदिया