- दीड वर्षांच्या चिमुकलीला भंडारा डोंगरावर सोडले; पश्चात्तापाने आई-वडील पोलीस ठाण्यात हजर
‘गरीबीने हतबल झालो’ म्हणत सांगितली व्यथा
तळेगाव, दि. ९ सप्टेंबर २६: आर्थिक विवंचनेने हतबल झालेल्या दाम्पत्याने दीड वर्षांच्या चिमुकलीला देहूजवळील भंडारा डोंगरावर सोडल्याची घटना समोर आली होती. मुलीला एखाद्या सक्षम व्यक्तीचा आधार मिळेल, या विचारातून त्या दाम्पत्याने हा निर्णय घेतल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले. मात्र, नंतर पश्चात्ताप झाल्याने दोघेही स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाले.
अजय शिवशंकर यादव (२३) आणि त्यांची पत्नी खुशबू अजय यादव (२२, मूळ रा. उत्तर प्रदेश) हे रविवारी (६ सप्टेंबर) मुलीसह भंडारा डोंगरावर आले होते. आर्थिक अडचणींमुळे मुलीचे संगोपन करणे कठीण होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे मुलीला एखाद्या चांगल्या व्यक्तीचा आधार मिळेल, या आशेने तिला तेथे सोडले असल्याचे त्यांनी सांगितलं.
डोंगरावर एकटी असलेली चिमुकली स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आली. त्यांनी तळेगाव एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी मुलीला सुरक्षित ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी वायसीएम रुग्णालयात दाखल केले.
रुग्णालयात महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी चिमुकलीची काळजी घेतली. तिला खाऊ आणि खेळणी देत तिची देखभाल केली. दरम्यान विविध तपासणीत तिची प्रकृती स्थिर असून कोणतीही दुखापत आढळली नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तिचे निरागस हास्य पाहून पोलिस आणि डॉक्टरही भावूक झाले होते.
मुलीला सोडल्यानंतर अजय आणि खुशबू यांना पश्चात्ताप झाला. सोमवारी (७ सप्टेंबर) सायंकाळी दोघेही स्वतः तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल झाले. सुरुवातीला त्यांनी मुलगी मुंबईत बेवारस अवस्थेत सापडल्याचे सांगितले. मात्र, चौकशीनंतर ती आपलीच मुलगी असल्याचे मान्य केले.
‘ती आमचीच मुलगी आहे. आमच्याकडे खाण्यासाठीही पैसे नव्हते. तिचा सांभाळ करणे कठीण झाले होते. कोणीतरी सक्षम व्यक्ती तिला घेऊन जाईल, या आशेने तिला सोडले,’ अशी व्यथा त्यांनी पोलिसांसमोर मांडली.
पोलिसांनी अजय यादव आणि खुशबू यादव यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ९३ तसेच बाल न्याय अधिनियम २०१५ मधील कलम ७५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.
वायसीएम बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. दीपाली अंबिके यांनी सांगितले की, चिमुकलीच्या नियमित तपासण्या झाल्या असून ती ठणठणीत असल्याचे सांगितले.
#talegavdabhade #तळेगावपोलीस #pimprichinchwadpolice #childcare #bhandaradongarchild