पालघर (बोईसर):
मुंबईजवळील पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे एका ४० वर्षीय मजुराची चाकूने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विजय बेंद्रे (वय ४०) असे मृत मजुराचे नाव असून, बोईसर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मुख्य संशयित आरोपी सुनील तेलगेंडगे याला रेल्वे स्थानकावरून अटक केली आहे.
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात समोर आले की, मृत विजय बेंद्रे आणि आरोपी सुनील तेलगेंडगे हे दोघेही एकत्र मजुरीचे काम करत होते. रविवारी रात्री त्यांच्यात किरकोळ कारणावरून मोठा वाद झाला. या वादाच्या भरात आरोपी सुनीलने विजय यांच्या पायावर चाकूने सपासप वार केले आणि घटनास्थळावरून पळ काढला. चाकूच्या गंभीर वारामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आणि उपचारापूर्वीच विजय यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी तारापूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला. परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यांचे फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या काही तासांत शोध मोहीम राबवून फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपी सुनील तेलगेंडगेला बोईसर रेल्वे स्थानकातून बेड्या ठोकल्या. .
या प्रकरणी बोईसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
