इंडियन टीवी न्यूज ब्युरो चीफ प्रताप नागरे वाशिम जिल्हा
शहरात सुविधांची वाणवा; मग का करावा कराचा भरणा?
‘आप’चे नगर परिषदेला निवेदन : असुविधांबाबत उत्तर देण्याची मागणी
वाशिम : शहरात रस्त्यांची झालेली दुरावस्था, अनियमीत होणारा पाणी पुरवठा, बंद पथदिवे, अस्वच्छता, उद्यानांची झालेली दुरावस्था, डम्पिंग ग्राऊंडचा होणारा त्रास आदि समस्यांचा त्रास नागरिक सहन करीत आहेत. मग, नागरिकांनी कुठल्या सुविधांबाबत नगर परिषदेकडे कराचा भरणा करावा? असा प्रश्न आम आदमी पार्टीचे राम पाटील डोरले यांनी 7 मार्च रोजी नगर परिषदेकडे निवेदनाद्वारे विचारला आहे. तसेच या असुविधांबाबत उत्तर देण्याची मागणी देखील केली आहे.
आपच्या वतीने दिलेल्या निवेदनात नमूद केले की, वाशिम शहरातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. खड्ड्यांमुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, पाणी पुरवठा 10 ते 12 दिवसाआड होतो, ते पाणी सुद्धा पिवळे पिण्यायोग्य नसते, त्यामुळे नागरिक आजारी पडतात, शहरातील बऱ्याच वार्डात नियमीत कचरा संकलन होत नाही, परिणामी अस्वच्छता व दुर्गंधीचा नागरिकांना सामना करावा लागतो, बंद पथदिव्यांमुळे शहरातील रस्त्यांवर रात्री अंधार राहतो, शहरात उद्यानांची रया गेली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक असो अथवा लहान मुलांना बसणे, खेळण्यासाठी जागा नाही, शहरातील कचऱ्याचे संकलन करून डम्पींग ग्राऊंडवर टाकला जातो. मात्र, या कचऱ्याची वेळेत विल्हेवाट लागत नसल्यामुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो, शहरामध्ये एवढ्या असुविधा असताना मालमत्ता धारकांनी नगर परिषदेकडे कुठल्या सुविधांबाबत कराचा भरणा करावा? असा प्रश्न निवेदनाद्वारे उपस्थित केला आहे. या निवेदनाची प्रतिलिपी जिल्हाधिकारी यांना देण्यात आली आहे.
……
असुविधांबाबत मागीतले उत्तर
वाशिम शहरात असणाऱ्या असुविधांबाबत नगर परिषदेने तातडीने लेखी स्वरुपात उत्तर द्यावे, अशी मागणी देखील आपचे राम पाटील डोरले यांनी केली आहे. त्यामुळे नगर परिषद नेमके काय उत्तर देणार, याकडे नजरा लागल्या आहेत.
….