इंडियन टीवी न्यूज वाशिम जिल्हा प्रतिनिधी प्रताप नागरे
वशिम शहरातील नाट्यगृहाचा रखडलेला प्रश्न सोडवा!
आप’ची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी : वारंवार मुदतवाढ देऊनही कामे अपूर्णच
वाशिम : शहरातील अकोला नाका परिसरातील ९.५ कोटी रुपयांच्या नाट्यगृहाचे १८ महिन्यांत पूर्ण करावयाचे काम, वारंवार मुदतवाढ देऊन तब्बल १० वर्षानंतरही अपूर्णच आहे. त्यामुळे दीर्घ कालावधीपासून रखडलेले नाट्यगृहाचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी २१ मार्च रोजी आम आदमी पार्टीचे राम पाटील डोरले यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले की, शहरातील अकोला नाका भागातील टेम्पल गार्डन जवळ अंदाजे ९ कोटी रुपयाचे नाट्यगृह साकारण्यासाठी २ जून २०१४ रोजी कार्यारंभ आदेश काढण्यात आले होते. नगर पालीकेकडून ११ कोटी १६ लाखाचा प्रस्ताव शासनाकडे २०१२ मध्ये सादर करण्यात आला होता. यासाठी ९ कोटी ५० लाख मंजूर करण्यात आले. १८ महिन्यात काम पूर्ण होणे गरजेचे असताना ७ वेळा या कामाला मुदतवाढ दिली. तर ६ वेळा नोटीस बजावण्यात आल्या. कामाच्या विलंबाबाबत २०२० मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी संबंधित कंत्राटदारास बोलावून जाबही विचारला होता. आतापर्यंत ५ कोटी ३१ लाख ८५ हजार रुपयाचे देयके अदा करण्यात आलेली असूनही जवळपास १० वर्षात नाट्यगृहाची इमारत आकार घेवू शकली नाही. अद्यापही बरेच कामे अपूर्ण आहेत. यामध्ये ध्वनी तंत्रज्ञान व आतील सजावटीची कामे जवळपास ५० टक्के पूर्ण झाली असून त्यावर ४६ लाख रुपयाचा खर्च करण्यात आला आहे. यासोबतच स्टेज, लाईट, फर्निचर आदी कामे तशीच रखडलेली आहेत.
नाट्यगृह इमारतीमध्ये वातानुकुलीत कामाकरीता १ कोटी ६१ लाख १६ हजार ४०८ रुपयाची निविदा २०१६ मध्ये प्रसिद्ध झाली होती. २०१७ मध्ये कार्यारंभ आदेश काढण्यात आले. या कामाला तीन महिन्याची मुदत असताना तीन ३ वेळा मुदतवाढ आणि अनेकवेळा नोटीसा देण्यात आल्या आहेत. २०२३ पर्यंत ७६ लाख ६१ हजार ९४३ रुपयाचे बिले अदा करण्यात आलेली आहेत. आतापर्यंत नाट्यगृहाच्या कामाला अनेकदा मुदतवाढ देवूनही बहुतांश कामे अपूर्णच आहेत. त्यामुळे नाट्यगृहाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी या निवेदनातून केली. अन्यथा आम आदमी पार्टीच्या वतीने लोककलावंत, शहरवासीयांच्या हितास्तव आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे.
….
…तर हे प्रशासनाचे अपयश
वाशिम शहरातील नाट्यगृहाचा प्रश्न गेल्या १० वर्षांपासून रखडलेला आहे. करोडो रुपयांची ही वास्तू धूळखात उभी आहे. संबंधित कंत्राटदारांना वारंवार मुदतवाढ देऊनही कामे होत नसतील तर हे प्रशासनाचे अपयश आहे. याबाबत नगर परिषद मुख्याधिकारी यांच्याशी सकारात्मक चर्चा केली असून, १मे पर्यंत काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे.
काम पूर्ण न झाल्यास न्यायलयात जाण्याचा इशारा देण्यात आला.
-राम पाटील डोरले,
आम आदमी पार्टी, वाशिम
….