
इंडियन टीव्ही न्यूज प्रताप नागरे
परभणी शहराच्या विकासकामांचा आढावा आज मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत घेतला.
परभणी शहरासाठी पाणीपुरवठा योजना, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, क्रीडा संकुल, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प यांसारख्या महत्त्वाच्या विकासकामांची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक असलेल्या साठ एकर जागेचा मागणी प्रस्ताव तातडीनं शासनाकडे सादर करावा. तसंच परभणी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी त्वरित ठोस उपाययोजना राबवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी केल्या.
परभणी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या येलदरी धरणात पर्याप्त जलसाठा उपलब्ध आहे. मात्र वितरण व्यवस्थेच्या कमतरतेमुळे व नियोजनाच्या अभावामुळे परभणी शहरातील नागरिकांना नियमित पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे प्रभावी नियोजन करुन तातडीनं सुधारणा करावी आणि नागरिकांना सुरळीत पाणी उपलब्ध करून द्यावा. महानगरपालिकेच्या नवीन इमारतीसाठी उत्कृष्ट आराखडा तयार करण्यासाठी खुली स्पर्धा आयोजित करावी, तसंच गुणवत्तापूर्ण आराखडा अंतिम करण्यात यावा. त्याचप्रमाणे नाट्यगृहाच्या सुधारित प्रशासकीय मंजुरीचा प्रस्ताव तातडीनं शासनाकडे पाठवावा, अशा सूचना केल्या.