इंडियन टीव्ही न्यूज प्रताप नागरे
📍नागपूर
मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस व केंद्रीय मंत्री श्री. नितिनजी गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली आज नागपूर येथे त्र्यंबकेश्वर-नाशिक येथे २०२७ मध्ये होणाऱ्या ‘सिंहस्थ कुंभमेळा’च्या निमित्ताने रस्ते विकासासंदर्भात बैठक पार पडली.
२०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या तयारीचा भाग म्हणून, नाशिकला जोडणाऱ्या प्रमुख महामार्गांच्या पायाभूत सुविधांचा तातडीने विकास करण्याची गरज या बैठकीत अधोरेखित करण्यात आली. नाशिक आणि आसपासच्या शहरांना जोडणारे रस्ते अधिक सुरक्षित, सुसज्ज आणि सक्षम बनवण्यासाठी विविध उपाययोजनांवर सविस्तर चर्चा झाली. या अंतर्गत रस्त्यांचे रुंदीकरण, नवीन बायपास रस्त्यांची निर्मिती, तसेच कुंभमेळ्यादरम्यान होणाऱ्या पर्यटकांच्या प्रचंड गर्दीला हाताळण्यासाठी प्रगत वाहतूक व्यवस्थापन प्रणालींच्या अंमलबजावणीचा समावेश आहे.
याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. शिवेंद्रसिंह राजे भोसले, खासदार श्रीमती स्मिता वाघ, आमदार श्रीमती देवयानी फरांदे, आमदार श्री. मंगेश चव्हाण यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.