सिद्धार्थ डावरे यांच्या गीताने आंदोलनकर्त्यांमध्ये निर्माण केली नवी ऊर्जा –
“लढा हा पुन्हा कुणी लढणार नाही, जरांगे पाटील पुन्हा घडणार नाही” सोशल मीडियावर व्हायरल!
परमेश्वर चांदणे इंडियन टीव्ही न्यूज
सोशल मीडियावर लाखोंच्या संख्येने व्हायरल झालेले “लढा हा पुन्हा कुणी लढणार नाही, जरांगे पाटील पुन्हा घडणार नाही” हे गीत आंदोलनकर्त्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाले आहे. या गीताचे लेखक सिद्धार्थ लक्ष्मण डावरे यांचा मा. मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सहकारी टीम माजलगावच्या वतीने सत्कार करण्यात आला.
माजलगाव तालुक्यातील देपेगाव येथील बौद्ध समाजातील युवा कार्यकर्ता सिद्धार्थ डावरे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे या हेतूने आंदोलनाला चालना देणारे गीत लिहिले. हे गीत जळगाव जिल्ह्यातील तळेगाव येथील आदिवासी समाजातील सुप्रसिद्ध गायक अशोक कोळी यांनी आपल्या सुमधुर आवाजात गाऊन सोशल मीडियावर व्हायरल केले. बघता बघता लाखोंच्या संख्येने रिल्स, स्टोरी, स्टेटस आणि पोस्ट शेअर होत या गीताने मराठा समाजातील बांधवांना अक्षरशः वेड लावले.
गीताच्या शेवटच्या ओळी – “लढा हा पुन्हा कुणी लढणार नाही, जरांगे पाटील पुन्हा घडणार नाही” – आंदोलकांच्या मनाला इतक्या भावल्या की प्रत्येकाच्या मोबाईलवर हे शब्द ऐकू येऊ लागले.
गीताचे लेखक सिद्धार्थ डावरे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, “मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मुंबई येथे झालेल्या आंदोलनात जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा यासाठी हे गीत लिहिले. आंदोलनकर्त्यांनी मिळवून दिलेली प्रतिक्रिया पाहून आपण केलेला प्रयत्न यशस्वी झाल्याचा आनंद होत आहे.”
माजलगाव येथील मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सहकाऱ्यांनी – मा. नितीन भैय्या काळे, मनोज तात्या जगताप, रामचंद्र डोईजड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी – तसेच देपेगावचे सरपंच दत्तात्रय कोकाटे, आणि मित्र राहुल मोरे, राम गायकवाड, गणेश काळे यांच्या उपस्थितीत सिद्धार्थ डावरे यांचा मान सन्मान केला. गाण्यामुळे आंदोलनात निर्माण झालेली ऊर्जा, लोकांचे मन जिंकणारे शब्द आणि लोकांना सहभागासाठी प्रेरित करणारा प्रभाव याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच, देपेगाव या छोट्याशा गावाचे नाव महाराष्ट्रभर पोहोचविल्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले.
सिद्धार्थ डावरे यांनी यापूर्वीही आमदार प्रकाश दादा सोळंके यांचे पुतणे जयसिंग भैय्या सोळंके, तसेच रमेश आडसकर, बाबरी मुंडे, सदानंद भैय्या प्रधान यांच्यावर गीतलेखन केले असून काही लोकगीतांनाही शब्द दिले आहेत. त्यांच्या प्रतिभेवरून ते भविष्यात उत्कृष्ट गीतकार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.