
इंडियन टीही न्यूज वाशिम जिल्हा प्रतिनिधी प्रताप नागरे
राज्यात वाशिमच्या ‘सीएस’चा नावलौकिक; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव होणार
१० महिन्यांतील कामगिरीचे मुल्यमापन : वाशिमच्या शिरपेचात मानाचा तुरा
वाशिम,दि.५ एप्रिल (जिमाका) राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत अलौकीक, उल्लेखनीय कामगिरी करत वाशिमचे जिल्हा शल्य चिकित्सक (सीएस) डॉ. अनिल कावरखे यांनी राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. एप्रिल २०२४ ते जानेवारी २०२५ या दहा महिन्यांच्या कालावधीत केलेल्या कार्याचे मूल्यमापन करण्यात आले असून, त्या आधारे त्यांची निवड झाली आहे. त्यांच्या या यशाचा गौरव राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ७ एप्रिल रोजी मुंबईत होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमात करण्यात येणार आहे.
डॉ. कावरखे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर सरकारी रुग्णालयांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्याचा ध्यास घेतला. वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि सहकाऱ्यांच्या सहकार्याने नियोजनबद्ध अंमलबजावणी करत त्यांनी सरकारी रुग्णालयांचा दर्जा उंचावला. आरोग्य सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यावर त्यांनी विशेष भर दिला. नियमबद्ध अंमलबजावणी, डॉक्टर व कर्मचाऱ्यांशी योग्य समन्वय, आणि आधुनिक वैद्यकीय सुविधा यांचा प्रभावी वापर करत जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेला नवे बळ दिले. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ३० विविध निर्देशांकांच्या आधारे जिल्ह्यांचे मूल्यमापन करण्यात आले. यामध्ये मातृ आरोग्य, बाल आरोग्य, कुटुंब नियोजन यांसारख्या घटकांचा समावेश होता. मागील दहा महिन्यांत राज्यभरात पडताळणी केल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक संवर्गातून वाशिमचा क्रमांक अव्वल ठरला. डॉ. अनिल कावरखे यांच्या या कार्याचा गुणगौरव ७ एप्रिल रोजी मुंबई येथे मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
…………………
वरिष्ठांचे मार्गदर्शन
जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे व आरोग्य उपसंचालक डाॅ. कमलेश भंडारी यांच्या मार्गदर्शनात जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. अनिल कावरखे यांनी आरोग्य क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी बजावली आहे.
…………
एनसीडी निदानामध्ये राज्यात द्वितीय
हायपरटेन्शन, मधुमेह यांसारख्या असंसर्गजन्य आजारांच्या तपासणी व निदानासाठी नॅशनल एनसीडी पोर्टलवरील कामगिरीत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे यांनी राज्यात दुसरे स्थान मिळविले आहे. ही कामगिरीदेखील डॉ. कावरखे यांच्या नेतृत्वातच शक्य झाली.
……..
ऐतिहासिक यश; जिल्ह्याचा सन्मान वाढला
वाशिमच्या आरोग्य विभागातील इतिहासात प्रथमच एखाद्या जिल्हा शल्य चिकित्सकाने राज्यात सर्वोच्च स्थान मिळवले आहे. याआधी कोणालाही ही कामगिरी साधता आली नव्हती. त्यामुळे डॉ. अनिल कावरखे यांचा हा पराक्रम प्रेरणादायी ठरला. त्यांच्या या यशामुळे वाशिम जिल्ह्याचा सन्मान वाढला आहे.
……….
मुंबईत होणार राज्यस्तरीय गौरव समारंभ
जागतिक आरोग्य दिनानिमित्त ७ एप्रिल रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह, मुंबई येथे राज्यस्तरीय कार्यक्रम होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत डॉ. कावरखे यांच्यासह राज्यभरातील निवडक आरोग्य अधिकारी व जिल्ह्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. वाशिम येथून डाॅ. कावरखे यांच्यासोबत जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. प्रेमकुमार ठोंबरे व चमू मुंबई येथील कार्यक्रमात हजर राहणार आहेत.