
इंडियन टीवी न्यूज जिल्हा प्रतिनिधी प्रताप नागरे वाशिम
सरकारी कामांच्या ई-निविदा प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव!
‘आप’चे निवेदन : लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्या जवळील व्यक्तिच बनले कंत्राटदार
वाशिम : आमदार, खासदार यांच्या निधीतून होणाऱ्या सरकारी कामांच्या ई-निविदा प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्यामुळे ही निविदा प्रक्रिया पारदर्शकपणे राबवावी. या प्रक्रियेत काही लोकप्रतिनिधी, तर काही अधिकारी आपल्या पदाचा वापर करून जवळील व्यक्तिंनाच ई-निविदा देऊन नियमांना हरताळ फासत आहेत. त्यामुळे प्रत्येक सरकारी कार्यालयात ई-निविदेची माहिती स्क्रिनिंग पद्धतीने दर्शनी भागात लावावी, अशी मागणी आम आदमी पार्टीचे राम पाटील डोरले यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले की, जिल्ह्यात आमदार, खासदार यांच्या विकास निधीतून होणाऱ्या शासकीय कामांच्या ई-निविदा प्रक्रियेत कुठल्याही प्रकारचा पारदर्शकपणा राहिलेला नाही. त्यामुळे या ई-निविदा प्रक्रियेत आमदार, खासदार, अधिकारी, कर्मचारी यांच्या संगणमताने जवळील व्यक्तींच्या आर्थिक हितासाठी मोठ्या प्रमाणावर हस्तक्षेप होत आहे. परिणामी, अनेक कामे बोगस पद्धतीने करणे, पात्रता नसताना कामे पदरात पाडून घेणे, थातूर-मातूर पद्धतीने कामे करून अधिकाऱ्यांच्या सहकार्याने बिले काढून घेणे असे प्रकार होत आहेत. हे प्रकार थांबविण्याच्या दृष्टीने प्रत्येक सरकारी कामाची ई-निविदा प्रत्येक सरकारी कार्यालयात स्क्रिनिंग पद्धतीने दर्शनी भागात लावावी, सोबतच या कामांची ई-निविदा कुठल्याही स्थानिक वृत्तपत्रातून प्रसिद्ध न करता सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषेतील दैनिक वृत्तपत्रांतून प्रकाशित करणे गरजेचे आहे. कारण, आत्तापर्यंत बहुतांश ई-निविदा प्रक्रियेच्या जाहिराती ह्या कुणीही न वाचणाऱ्या स्थानिक वृत्तपत्रातून प्रकाशित केल्या जातात. परिणामी, ही ई-निविदा प्रक्रिया सर्व नागरिक अथवा काम करणाऱ्या पात्र व्यक्तिंपर्यंत पोहतच नाही. त्यामुळे आपण या प्रकरणी जातीने लक्ष घालून, वरील सर्व बाबींवर तातडीने बैठक बोलावून अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. अन्यथा १ मे या महाराष्ट्र दिनापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात बेमुदत उपोषणाचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
—–