प्रतिनिधी – विठ्ठल कदम शिवपुरीकर
चिकाळा/शिवपुरी : सामाजिक, शैक्षणिक व बौद्ध धम्माच्या प्रसारासाठी सातत्याने कार्य करणारे, आक्रमक व निर्भीड नेतृत्व म्हणून ओळख असलेले रमाई बौद्ध धम्म परिषदेचे आयोजक तथा भीम आर्मी नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष बोधीवृक्ष कदम यांना राज्यस्तरीय “युवा रत्न पुरस्कार” प्रदान करून गौरविण्यात आले.हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रज्ञा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, नांदेड (महाराष्ट्र) आणि भास्कर व्यायाम शाळा व क्रीडा मंडळ, नांदेड (महाराष्ट्र) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात प्रदान करण्यात आला. सामाजिक परिवर्तन, युवकांचे संघटन, बौद्ध धम्माचा प्रचार-प्रसार, संविधान जागृती तसेच समाजहितासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान त्यांना देण्यात आला.बोधीवृक्ष कदम यांनी विविध सामाजिक उपक्रम, धम्म परिषदांचे यशस्वी आयोजन, युवकांना संघटित करण्याचे कार्य आणि वंचित, शोषित समाजाच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवून समाजात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कार्यामुळे अनेक युवक सामाजिक चळवळीत सक्रिय झाले असून समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.या राज्यस्तरीय सन्मानानंतर चिकाळा, शिवपुरी परिसरासह नांदेड जिल्ह्यात त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध सामाजिक, राजकीय, बौद्ध संघटना तसेच नागरिकांकडून बोधीवृक्ष कदम यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत हा पुरस्कार संपूर्ण परिसरासाठी अभिमानाची बाब असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.