बारामती | प्रतिनिधी
बारामती: शेतकऱ्यांच्या मालाला योग्य हमीभाव मिळावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) यांच्या वतीने बारामती येथे जोरदार आंदोलन करण्यात आले.
योगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्त्यांनी तिरंगा चौक, बारामती येथे एकत्र येत सरकारविरोधात घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला. विशेष म्हणजे आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले.
शेतकऱ्यांच्या उत्पादनाला किमान आधारभूत किंमत (MSP) मिळावी तसेच त्यांच्या हिताचे धोरण राबवावे, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.
आंदोलनानंतर कार्यकर्त्यांनी बैलगाडीतून नवीन प्रशासकीय भवन, बारामती येथे जाऊन प्रांताधिकारी यांना निवेदन सादर केले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
पुणे, बारामती
राहुल चव्हाण